जि.प.ला मिळेना जिल्हा आरोग्य अधिकारी !
कोरोना महामारीच्या काळातच जिल्हा परिषदेकडे पूर्णवेळ जिल्हा आरोग्य अधिकारी नसल्याने अडचणी येत आहेत. जि प अध्यक्ष यासह जिल्हाधिकाऱ्यांनीही वारंवार स्मरणपत्र देऊनही आरोग्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे.
शहरानंतर आता ग्रामीण भागातही कोणाचा उद्रेक वाढत आहे. दिवसाकाठी दीडशे हून अधिक रूग्ण ग्रामीण भागात सापडत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. मात्र १८ एप्रिल रोजी तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांना अवैध दारू आणि रोख रकमेसह पकडले होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून जिल्हा परिषदेला पूर्णवेळ आरोग्य अधिकारी मिळालेला नाही. त्यानंतर सोयगावच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र तेच होम क्वारान्टीन झाल्याने पुन्हा अडचण निर्माण झाली. आता एका अधिकाऱ्याकडे पुन्हा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा जवळपास पूर्णवेळ आरोग्याधिकाऱ्या विनाच आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. टीम लीडरच असल्याने यंत्रणाही सुस्तावलेल्याचे दिसून येते.
वारंवार दिली स्मरणपत्रे !
दरम्यान जिल्हा परिषदेला पूर्णवेळ आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करत जिल्हा परिषदेने आरोग्य मंत्र्यांसह शासनाकडे स्मरणपत्र दिले आहेत. त्याचबरोबर सीईओ मंगेश गोंदावले यांच्यासह जिप अध्यक्षा मिनाताई शेळके यांनीही याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समक्ष मुद्दा मांडला होत. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत शासन स्तरावर अनेक वेळा पत्रे दिली आहेत. जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेनेही पूर्णवेळ आरोग्य अधिकारी देण्याची मागणी केली आहे.
नवीन अधिकारी नको असे ठरले : सीईओ गोंदावले
परवाच आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार आता आहे त्या परिस्थितीतच काम करायचे आहे. नवीन अधिकारी आले तर घडी विस्कटू शकते. नव्या अधिकार्याला सर्व गोष्टी समजून घेण्याचा वेळ लागतो. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काम करावे असे यावर एकमत झाले आहे. सध्याचे जिल्हा आरोग्य साथ रोग तज्ञ आहे. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे.
- मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.












